नाशिक जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे. तर शिंदे गटात उत्साह पाहायला मिळतोय. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने नाशिकच्या राजकारणाची नवी दिशा ठरत आहे. आपण यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊ या.
Maharashtra Politics : नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय! शिवसेनेला नाशिकमध्ये मोठी गळती लागली आहे. एकीकडे स्थानिक सूत्रं मामा राजवाडेंकडे जात आहेत, तर दुसरीकडे नाशिकचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. ही फक्त सुरुवात आहे की, आगामी निवडणुकांच्या आधी ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये आणखी हादरे बसणार आहेत? हे सविस्तर पाहू या.
शिवसेनेचा गड डगमगतोय?
नाशिक जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व सातत्याने डळमळीत होतंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील जुने अन् निष्ठावान चेहरे आता एकामागून एक वेगळ्या वाटेवर निघाले आहेत. आता नाशिकमध्ये मामा राजवाडेंकडे संघटनात्मक सूत्रं सोपवण्यात आलीत. त्यांच्या अनुभवाचा उपयोग पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी होणार असला, तरी याच दरम्यान एक मोठा धक्का ठाकरेंना मिळालाय. माजी आमदार विलास शिंदे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे शिंदे गट आता नाशिकमध्ये आणखी बळकट होणार आहे. शिंदे गटासाठी हा मोठा विजय मानला जातोय, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही आणखी एक डोकेदुखी ठरू शकते.
मामा राजवाडे हे जुने अनुभवी शिवसैनिक आहेत. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करणं, नव्या कार्यकर्त्यांना जोडणं, आणि स्थानिक मतदारांमध्ये पक्षाचा प्रभाव टिकवणं – अशी जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे. पण प्रश्न असा आहे की, जेव्हा वरिष्ठ नेते पक्ष सोडून जातात, तेव्हा स्थानिक संघटन किती काळ टिकणार? राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, नाशिकमध्ये शिवसेनेचा पारंपरिक गड आता ढासाळतोय का? शिंदे गटाच्या जोरदार घुसखोरीमुळे उद्धव सेनेला आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं. राजवाडेंकडे सूत्रं देणं म्हणजे नेतृत्व बदलायचा प्रयत्न असला तरी, विलास शिंदेसारखे वजनदार चेहरे निघून जाणं, याचा थेट फटका संघटनावर बसू शकतो.
गळती, गटबाजी… नवे समीकरण
नाशिकमधली ही शिवसेनेतील घडामोडी भविष्यात काय रंग घेणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. मामा राजवाडे संघटना सावरू शकतील का? की शिंदे गट यशस्वी होईल? शिवसेनेचा पारंपरिक गड असलेला नाशिक, आता भाजप-शिंदे गटाच्या प्रभावाखाली जातोय. महापालिकेचं चित्र अजून धूसर आहे. पण भूमिगत हालचाली सुरूच आहेत. कोण पुढे येणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
नाशिकमधील तरुण मतदार, शेतकऱ्यांची नाराजी, आणि स्थानिक प्रश्न – हे सगळं आगामी निवडणुकांच्या पारड्यात काय टाकणार? नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. इथल्या राजकारणात शहरी आणि ग्रामीण भागाचा वेगळा प्रभाव आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि आता शिंदे गट – सर्व पक्षांची इथे ताकद अजमावली जाते. परंतु मागील काही दिवसांपासून भाजपचा दबदबा वाढत आहे. ग्रामपंचायती ते महापालिका आणि विधानसभेपर्यंत चुरस पाहायला मिळतेय. नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप होत आहे. गळती, गटबाजीमुळे नवे कोणते समीकरण जन्माला येते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
नाशिक महापालिकेवर सत्ता कोणाची?
नाशिक महापालिका निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागून आहे. पण खरी चुरस कुणामध्ये आहे? उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बळकट होत चाललेला शिंदे गट? या दोन्ही गटांमध्ये सध्या राजकीय कुरघोडी, आरोप-प्रत्यारोप, आणि कार्यकर्त्यांच्या ओढापोटी नाशिकचं राजकारण चांगलंच तापलं आहे. शिंदे गटाने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर संपर्क मोहिमा, दौरे, आणि कार्यकर्त्यांना घेणं सुरू केलं आहे. विलास शिंदेंसारखे नेते शिंदे गटात दाखल होत आहेत.
‘शिवसेना म्हणजे आता आम्हीच खरी सेना’ असं ठणकावणारे बॅनरही लावले गेले आहेत. उद्धव ठाकरे यांचे दौरे, सभा, आणि ‘आपणच खरी शिवसेना’ ही प्रतिमा जपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण खरा प्रश्न असा आहे की, स्थानिक पातळीवर नेमकं संघटन कोणाचं मजबूत आहे? नाशिक महापालिकेत सध्या जनतेचा मूड पाहता, दोन्ही गटांपुढे आव्हानं मोठी आहेत. शिंदे गटाकडे सत्ता आहे पण लोकप्रियता अजूनही चाचपडतेय. तर ठाकरे गटाकडे सहानुभूती आहे, पण कार्यकर्त्यांची संख्या घटते आहे.
अखेर नाशिककर ठरवणार महापालिकेवर सत्ता कोणाची? जुनी शिवसेना की सत्तेवरची सेना?