What Is Ringan Sohla And Bandhu Bhet: मे-जून महिना आला की, साऱ्या महाराष्ट्राला लागतो तो पंढरपूरच्या वारीचा वेध. ही वारी म्हणजे केवळ महाराष्ट्राची नाही, तर संपूर्ण जगाची आस्थेची आणि भक्तीची परंपरा आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविक आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघतात. हीच वारी, वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाची आहे.
वर्षानुवर्षे ही परंपरा अखंड सुरू आहे. एकेकाळी स्थानिक वाटणारी ही वारी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. सर्व जाती-धर्म, पंथाचे लोक एकत्र येतात, विठुरायाच्या नामगजरात मार्गक्रमण करतात. ऊन, वारा, पाऊस काहीही असो, वारकरी न थकता विठोबाच्या भेटीसाठी चालत राहतात. वाटेत एकत्र स्वयंपाक, जेवण, झोप, गप्पा, नामस्मरण – सारे काही सामूहिक आणि आनंददायी.
वारीचा खास सोहळा: रिंगण
वारीमधील एक आगळा-वेगळा सोहळा म्हणजे ‘रिंगण’. ही परंपरा खास संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्यात दिसते. त्यांच्या पालखीसोबत असतो खास अश्व (घोडा), जो या रिंगणात धावतो. असे मानले जाते की, या अश्वावर संत स्वतः विराजमान असतात. त्यामुळे त्याला नमस्कार करण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होते. रिंगणासाठी मोकळं मैदान असतं. वारकरी एका वर्तुळात उभे राहतात, मधोमध अश्व धावतो. टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘विठ्ठल, विठ्ठल’ नामस्मरण चालू असतं. घोड्याच्या मागे वारकरीही धावत जातात. रिंगणानंतर झिम्मा, फुगड्या, मनोरे अशा आनंदात रंगलेले क्षण अनुभवायला मिळतात.
रिंगणाचे प्रकार
1. गोल रिंगण – वर्तुळाकार पद्धती, ज्यात दिंड्या गोलाकार उभ्या राहतात.
2. उभं रिंगण – पालखीसमोर समोरासमोर दिंड्या उभ्या राहतात आणि मधून अश्व धावतो.
बकरी रिंगण
वारीतील अजून एक वैशिष्ट्य – बकरी रिंगण. संत सोपानकाकांच्या पालखीत शेतकरी आपली मेंढ्या-बकऱ्या घेऊन पालखीला प्रदक्षिणा घालतात. हे दृश्य पिंपळी आणि इंदापूर येथे पाहायला मिळते.
महत्त्वाचे रिंगण ठिकाणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी
चांदोबाचा लिंब
बाजीराव विहीर
वाखरी
माळशिरस
ठाकूर बुवा समाधी
भंडीशेगाव
पालखी सोहळ्याचे रिंगण आणि खास वैशिष्ट्ये
संतांच्या पालखी सोहळ्यादरम्यान विविध ठिकाणी पारंपरिक रिंगण सोहळे साजरे होतात. यामध्ये तीन गोल रिंगण आणि तीन उभ्या रिंगणांचा समावेश होतो.
गोल रिंगण होणारी ठिकाणं
-बेलवडी
-इंदापूर
-अकलूज
या ठिकाणी वर्तुळाकार रिंगण पार पडतात, ज्यामध्ये अश्व आणि वारकरी यांचा समारंभ पारंपरिक गजरात रंगतो.
मेंढ्यांचे रिंगण – खास वैशिष्ट्य
काटेवाडी येथे ‘बकरी रिंगण’ साजरं केलं जातं. शेतकरी आपले मेंढ्या-बकऱ्यांसह पालखीला प्रदक्षिणा घालतात, ही एक खास पारंपरिक आणि ग्रामसंस्कृतीची झलक आहे.
उभे रिंगण होणारी ठिकाणं
-माळीनगर (तोंडले-बोंडले)
-बाजीराव विहीर
-वाखरी (पादुका आरतीस्थळी)
या ठिकाणी दिंड्या पालखीच्या दोन्ही बाजूंनी समोरासमोर उभ्या राहत असतात आणि मधोमध अश्वाची धाव पाहायला मिळते.
पादुकांना नीरास्नान
सराटी येथे पवित्र पादुकांना नीरास्नान घालण्याची परंपरा पार पडते, जे भाविकांसाठी एक अत्यंत भावनिक क्षण असतो.
दिंड्यांचा सहभाग
पालखीच्या पुढे 27 दिंड्या, तर मागे 370 दिंड्या सहभाग घेत आहेत. प्रत्येक दिंडीचे पथक ही भक्ती, शिस्त आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.
वारीतील बंधू भेट म्हणजे काय?
वारीतील बंधू भेट म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी भेटीचा सोहळा. हा सोहळा वारीच्या मार्गावर, तोंडले-बोंडले (येथे होतो. दोन्ही पालख्या समोरासमोर येतात आणि मानकरी एकमेकांना नारळ प्रसाद देतात. हा सोहळा भाविकांसाठी खूप महत्वाचा असतो, कारण यातून भावनिक आणि आध्यात्मिक नाते व्यक्त होते.यासोबतच तुकोबारायांच्या पालखीची आणि सोपानकाकांच्या पालखीची देखील भेट याच मार्गावर होते. काही ठिकाणी वाखरी येथे इतर संतांच्या पालख्यांची देखील भेट होते.
नेमकं काय होतं?
वारीच्या वाटेवर चारही भावंडांचा पायी पालखी सोहळा निघतो. यापैकी दोन भावंडे म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखींची भेट होते. माळशिरस आणि पंढरपूरच्या सीमेवर हा नेत्रदीपक सोहळा पार पडतो. हा सोहळा पाहण्यासाठी वारकरी नजरा लावून बसलेले असतात. ज्ञानेश्वरांची पालखी आणि सोपानकाकांची पालखी एकमेकांना मिळतात. तोंडले-बोंडले (टप्पा) येथे हा सोहळा होतो. दोन्ही पालख्या समोरासमोर येतात, मानकरी एकमेकांना नारळ प्रसाद देतात.
Disclaimer: सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेध लागले आहे. वारीचा अद्भुत सोहळा सुरू झालाय. हा सोहळा दोन विशेष गोष्टींनी लक्ष वेधून घेतो. एक म्हणजे रिंगण आणि दुसरं म्हणजे बंधू भेट. आपण या संदर्भात सविस्तर जाणून घेऊ या.