पुण्यात रेव्ह पार्टी, रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये एकनाथ खडसे यांच्या जावयालाच अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Police Raid On Pune Rave Party : पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या पार्टीत ड्रग्ज, हुक्का आणि मद्यप्राशन सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या पार्टीत राष्ट्रवादी नेत्या डॉ. रोहिणी खडसे यांचे पती सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मिळालेल्या गुप्त माहितीनंतर खराडीतील एका लॉजमधील फ्लॅटवर छापा टाकला. तिथे रेव्ह पार्टी हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू होती. फ्लॅटमधून कोकेन, एलएसडी, हुक्का, मद्याच्या बाटल्या आणि पार्टीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 2 महिला आणि 5 पुरुषांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या अटकेत एक व्यक्ती रोहिणी खडसेंचे पती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे त्याच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

माझ्या जावयाला अडकवण्याचा प्रयत्न

पुण्यातील खराडी परिसरात नुकतीच उघडकीस आलेली रेव्ह पार्टी आणि त्यातील सहभागींबाबत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असतानाच, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणात त्यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचे नाव समोर आल्याने खडसेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या जावयाला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. मी अजून संपूर्ण माहिती घेतलेली नाही, पण सध्याचं जे वातावरण आहे, ते पाहता कोणालाही अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मी अनेकदा जाहीरपणे सरकारच्या विरोधात बोललो आहे. त्यामुळे माझ्या वक्तव्यांमुळे जावयाला लक्ष्य केलं जातंय, असं मला वाटतं. गुन्हा केलेला असेल, तर शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हेगार कोणताही असो. नात्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रश्नच येत नाही. पण जर हे संपूर्ण प्रकरणच कुणाच्या षड्यंत्राचा भाग असेल, तर तेही उघड झालं पाहिजे. मी याबाबत माहिती घेत आहे. नीट चौकशी झाली पाहिजे. सत्य समोर आलं पाहिजे.

या वक्तव्यामुळे खडसे एकीकडे कुटुंबीय असल्यामुळे सावध पवित्रा घेत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टोलेही मारताना दिसत आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या छापेमारीत रेव्ह पार्टीतून अंमली पदार्थ, हुक्का, आणि मद्य जप्त करण्यात आले. काही महिला अन् पुरुषांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणात प्रांजल खेवलकर हे आयोजक होते, अशी माहिती देखील समोर आली आहे.

खडसेंचे जावई अडकणार?

मिळालेल्या माहितीनुसार, खडसे यांचे जावई प्रांजल केवलकर हेच या पार्टीचे आयोजक होते, असा दावा काही राजकीय नेत्यांनी केला आहे. त्यामुळे एकाच घरातील दोन व्यक्तींचा रेव्ह पार्टीत सहभाग असल्याचा संशय बळावतोय. या प्रकरणावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी थेट आरोप केला आहे. खडसे यांना काहीतरी घडणार आहे याची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी जावयाला आधीच अलर्ट करायला पाहिजे होतं, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. काही झालं की खडसे जबाबदारी टाळून दुसऱ्यावर ढकलतात, असा टोला महाजन यांनी लगावला.

राजकीय डॅमेज कंट्रोल सुरू

या प्रकरणाने राष्ट्रवादीच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. रोहिणी खडसे यांच्याकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, पक्षाकडून याप्रकरणाला ‘खाजगी बाब’ म्हणून दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधक मात्र यावरून नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. या कारवाईत वापरण्यात आलेल्या ड्रग्जचे मूळ स्त्रोत, सहभागी असलेले इतर लोक आणि आयोजकांची भूमिका यावर स्थानिक पोलिस आणि अंमली पदार्थविरोधी पथक (ANC) यांचा तपास सुरू आहे. काही आरोपींचे फोन कॉल्स, बँक व्यवहार, सोशल मीडिया चॅट्स तपासले जात आहेत.

रेव्ह पार्टी म्हणजे काय?

रेव्ह पार्टी ही एक अनौपचारिक, रात्री उशिरापर्यंत चालणारी पार्टी असते, जिथे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर EDM (Electronic Dance Music) आणि DJ च्या तालावर थिरकत असतात. अशा पार्टीमध्ये रंगीबेरंगी लाईट्स, ध्वनिप्रदूषण, धुंद वातावरण असते. अनेकदा मद्य अन् अमली पदार्थांचा वापरही सर्रास केला जातो. ही पार्टी बहुतेक वेळा फार्महाऊस, लॉजिंग फ्लॅट्स, जंगलातील बंदिस्त ठिकाणी किंवा शहरापासून थोडे लांब गुप्त जागी आयोजित केल्या जातात. ह्या पार्टींमध्ये सहभागी होण्यासाठी खास आमंत्रण किंवा सोशल मीडियावरून ‘कोड वर्ड्स’ चा वापर करून लोकांना बोलावलं जातं.

रेव्ह पार्टी कायदेशीर आहेत का?

रेव्ह पार्टी ही संकल्पना कायद्यानुसार बेकायदेशीर नाही, पण पार्टीत जर कोणतीही नियमभंगाची घटना घडली. विशेषतः अमली पदार्थांचा वापर, ध्वनीप्रदूषण, परवानगी नसलेली मद्यविक्री किंवा सार्वजनिक शांततेचा भंग झाला, तर ती रेव्ह पार्टी गुन्हेगारी स्वरूपाची ठरते. भारत सरकारच्या NDPS Act (1985) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार अशा पार्टीवर कारवाई होऊ शकते.

Leave a Comment