Semen Storage : मुलगा गेला, पण वंश थांबू नये..! वीर्य जपण्यासाठी आईची न्यायालयात धाव

Son’s Semen : मृत मुलाच्या वीर्यावर वंश पुढे नेण्यासाठी एका आईने थेट न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे? कुठे घडलं, आपण यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊ या.

Semen Storage : आई ही असते, मुलाच्या प्रत्येक स्वप्नासाठी झटणारी..मग तो मुलगा या जगात असो, किंवा त्याच्या आठवणी…मुंबई उच्च न्यायालयात अशीच एक विलक्षण घटना समोर आली आहे. एका आईची, तिच्या मृत मुलाच्या वंशासाठी सुरू असलेली लढाई. एका मृत तरुणाचं वीर्य जतन करण्यासाठी त्याच्या आईने कोर्टात धाव घेतली.
IVF सेंटरने नमुना सोडण्यास नकार दिला, म्हणून तिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आईने नोव्हा IVF सेंटरला मेल पाठवले, विनंती केली की, वीर्य नष्ट करू नका. पण केंद्राने कायद्याचा आधार देत नमुना देण्यास नकार दिला. आईने राज्य अन् केंद्र सरकारला विनंती केली, पण सगळीकडून केवळ नकारचं तिच्या पदरी पडला.

शेवटी तिने न्यायालयात धाव घेतली. आईने सांगितलं की, कुटुंबात आता पुरुषच उरलेला नाही. तिचा मुलगा, त्याचे वडील आणि काका – सगळे गेले.
मुलाच्या मृत्यूपूर्वी त्याने आपल्या मावशीला सांगितलं होतं, ‘माझ्या आईसाठी मूल जन्माला घाला. ही त्याची शेवटची इच्छा होती. कर्करोगाने त्रस्त असताना, या तरुणाने केमोथेरपीपूर्वी त्याचे वीर्य फ्रीज करण्याचा निर्णय घेतला होता. पण मृत्यूपूर्वी त्याने एका फॉर्मवर ‘वीर्य नष्ट करावे’ असा पर्याय निवडल्याचं दाखवलं गेलं. तो अविवाहित होता.

प्रकरण नेमकं काय?

मुंबई उच्च न्यायालयाने आईला तिच्या मृत मुलाचे वीर्य तिच्या याचिकेवर जतन करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने एका मृत अविवाहित पुरूषाचे गोठलेले वीर्य जतन करण्याचे आदेश एका प्रजनन केंद्राला (IVF सेंटर) दिले आहेत. मृत तरुणाच्या आईच्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. आईला तिचा वंश पुढे नेण्यासाठी या वीर्याचा वापर करायचा आहे. प्रजनन केंद्राने तिला वीर्य देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आईने न्यायालयात धाव घेतली होती.

वीर्य कधी जतन केले गेले?

महिलेच्या मुलाने केमोथेरपी दरम्यान त्याचे वीर्य जतन करण्याचा पर्याय निवडला होता. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जर खटल्याचा निर्णय येण्यापूर्वी वीर्य नमुना नष्ट झाला, तर याचिकेचा उद्देशच निष्फळ ठरेल. आईच्या याचिकेत म्हटलंय की, जेव्हा तिच्या मुलाला कर्करोगाचे निदान झाले तेव्हा त्याच्यावर उपचार करणाऱ्या ऑन्कोलॉजिस्टने त्याला त्याचे वीर्य गोठवण्याचा सल्ला दिला होता. कारण केमोथेरपीमुळे प्रजनन समस्या निर्माण होत होत्या. तिच्या मुलाने कुटुंबातील सदस्यांशी सल्लामसलत न करता त्याचा मृत्यू झाल्यास नमुना नष्ट करण्याचा निर्णय घेतला. 16 फेब्रुवारी रोजी त्याचे निधन झाले.

24 आणि 26 फेब्रुवारी रोजी महिलेने नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटरला ईमेल पाठवून विनंती केली की, त्यांनी वीर्य नमुना विल्हेवाट लावू नये. भविष्यात वापरण्यासाठी गुजरातमधील आयव्हीएफ सेंटरमध्ये नमुना हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. 27 फेब्रुवारी रोजी, नोव्हाने नमुना देण्यास नकार दिला. सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (नियमन) कायदा आणि नियमांनुसार आईला न्यायालयाकडून परवानगी घेण्यास सांगण्यात आले. 1 एप्रिल रोजी, महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य सचिवांनी तिला राष्ट्रीय मंडळाशी संपर्क साधण्यासाठी पत्र लिहिले. 6 मे रोजी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तिची विनंती फेटाळून लावली. त्यानंतर, आईने उच्च न्यायालयात धाव घेतली.

मृत तरुणाचा वीर्य नमुना साठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. अधिवक्ता निखलेश पोटे आणि तन्मय जाधव यांच्यामार्फत सादर केलेल्या त्याच्या याचिकेत म्हटले आहे की, तरुणाच्या कुटुंबात फक्त महिला नातेवाईक आहेत. त्याचे वडील 45 वर्षांचे असताना आणि काका 21 वर्षांचे असतानाच निधन झाले. मृत मुलाच्या वीर्यद्वारे कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याचा याचिकाकर्त्याचा मानस आहे. त्यात म्हटले आहे की, जेव्हा त्याचा मुलगा गंभीर स्थितीत होता आणि त्याला वाटले की त्याच्याकडे जास्त वेळ नाही, तेव्हा त्याने त्याच्या काकूला त्याच्या शुक्राणूंचे काहीतरी करून माझ्या आईची आणि कुटुंबाची काळजी घेतील, अशी मुले जन्माला घालण्यास सांगितले.

मृताच्या पालकांना कायदेशीररित्या शुक्राणू मिळविण्याचा अधिकार आहे. ते कायदेशीर वारस आहेत. या संपूर्ण प्रकरणात असं म्हटलंय की, मृत तरुणाने स्वाक्षरी केलेल्या फॉर्ममध्ये दोन कॉलम होते. पहिला म्हणजे नमुना नष्ट करणे किंवा तो पत्नीला (विवाहित असल्यास) देणे. याचिकाकर्त्याचा मृत मुलगा अविवाहित होता. अशा परिस्थितीत त्याने ‘नष्ट करणे’ हा पर्याय निवडला असावा, असं मानले जातंय. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पितळे म्हणाले की, मृत्यूनंतर व्यक्तीचे वीर्य कसे जतन करायचे? याबाबत याचिका महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करते. या प्रकरणात पुढील सुनावणी होईल. तोपर्यंत आयव्हीएफ सेंटरला शुक्राणूंचा नमुना सुरक्षित ठेवावा लागेल. मृत्यू नंतरही मुलाच्या इच्छेचा सन्मान राखण्यासाठी लढणारी ही आहे. तिच्या या याचिकेला न्याय मिळेल का?

Leave a Comment