Bachchu Kadu Hunger Strike For Farmers Loan Waiver : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 8 जूनपासून गुरुकुंज मोझारी येथे हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण आता मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे.
बच्चू कडूंची भूमिका नेमकी काय?
मोझारी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळाजवळून हा निषेध सुरू झाला. अमरावती येथील संत गाडगे बाबा मंदिरापासून मोझारीपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो समर्थक सहभागी झाले होते. आंदोलन सुरू करताना बच्चू कडू म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतमजुरांच्या उन्नतीसाठी स्वतंत्र वित्तीय महामंडळ, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वेतनात वाढ यासह अनेक मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने आपल्या ठरावात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली होती. परंतु निवडणुकीनंतर सत्तेत येऊन अनेक महिने उलटूनही सरकार ही आश्वासने पूर्ण करत नाही. म्हणूनच आम्ही आंदोलन सुरू करत आहोत.
शरद पवारांचा फोन
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी बच्चू कडूंना फोन करत तब्येतीची विचारपूस केली. आंदोलनासंदर्भात माहिती विचारली. पालकमंत्र्यासोबत बोलणं झालंय. कलेक्टर अन् एसपी सुद्धा भेटायला आले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग करून देऊ असं त्यांनी म्हटलंय. पण मी मिटिंगच्या बदल्यात उपोषण मागे घेणार नाही. भेट नकोय, आम्हाला निर्णय हवाय असंच बच्चू कडूंनी ठणकावून सांगितलं.
रोहित पवारांनाही दिला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बच्चू कडू यांच्या सर्व समस्या सरकारने गांभीर्याने घ्याव्यात, असे सांगितले. बच्चू कडू नेहमीच अशा लोकांचा आवाज बनतात ज्यांच्याकडे व्यवस्थेत ऐकले जात नाही. त्यांच्या मागण्या न्याय्य आहेत. त्या सोडवल्या पाहिजेत. ही वेळ आश्वासने पूर्ण करण्याची आहे, ती पुढे ढकलण्याची नाही. त्यांनी राज्य सरकारला बच्चू कडू यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून लवकरच तोडगा काढण्याचे आवाहन केले. बच्चू कडूंनी देखील त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे यांनी देखील बच्चू कडू यांना पाठिंबा दिला आहे.
या अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालावत असल्याचं समोर येतंय. त्यांचं दोन किलो वजन घटलं असल्याची माहिती मिळतेय. तर दरम्यान बच्चू कडू यांचा बीपी देखील लो झाला होता. त्यांनी त्वरित औषधं घ्यावीत, असा डॉक्टरांनी सल्ला दिलाय. परंतु बच्चू कडू मात्र उपचार घेण्यास सपशेल नकार देत आहेत. त्यामुळे त्यांचा अशक्तपणा देखील वाढत आहेत. आता या प्रकरणी सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या देखील अपेक्षा वाढल्या आहेत.
प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि त्यांना पूर्णपणे कर्जमुक्त करण्यासाठी सात वेळा कर्जमाफी द्यावी.
- शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) वेतनात वाजवी वाढ.
- शेतमजुरांच्या अपघाती मृत्यूच्या बाबतीत त्यांना विमा संरक्षणाची सुविधा.
- शेतीच्या प्रत्येक टप्प्याचा – पेरणीपासून ते कापणीपर्यंतचा – रोजगार हमी योजनेत समावेश केला पाहिजे.
- तेलंगणा मॉडेलनुसार शेतकऱ्यांना प्रति एकर 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत देण्यात यावी.
- रासायनिक खतांसारख्या सेंद्रिय खतावर अनुदानाची तरतूद.
- दुधातील भेसळीविरुद्ध कडक कारवाई करावी.
- गायीच्या दुधाची किमान आधारभूत किंमत 50 रुपये आणि म्हशीच्या दुधाची किमान आधारभूत किंमत 60 रुपये प्रति लिटर निश्चित करावी.
- कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी, बाजारात कांद्याची किंमत 40 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचेपर्यंत निर्यातीवर बंदी घालू नये.
- अपंगांना वेळेवर आणि नियमितपणे मानधन देण्यात यावे. http://www.youtube.com/@LokswarajyaLive
Disclaimer : सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासाठी बच्चू कडू यांनी 8 जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. दरम्यान शरद पवार यांनी त्यांना फोन केल्याची माहिती समोर येतेय. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी 8 जूनपासून गुरुकुंज मोझारी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या आंदोलनाला शरद पवार, रोहित पवार आणि मनोज जरांगे यांच्यासह अनेक नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. बच्चू कडू यांची प्रकृती खालावत असून त्यांचे वजन घटले आहे व बीपी कमी झाला आहे. तरीही ते उपचार घेण्यास नकार देत आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन सुरू राहील, असा निर्धार बच्चू कडूंनी केला आहे.