पाईपलाईन घोटाळा अन् डिझेलवर डल्ला! मेव्हणा-दाजीचा अफलातून मास्टरप्लॅन, जयपूरमध्ये आतापर्यंतची सर्वांत भयानक चोरी

पाईपलाईन घोटाळा अन् डिझेलवर डल्ला! मेव्हणा-दाजीचा अफलातून मास्टरप्लॅन, जयपूरमध्ये आतापर्यंतची सर्वांत भयानक चोरी

Pipeline Scam Diesel Theft Jaipur Crime News : जयपुरचं नाव घेतल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? राजस्थानमधील गुलाबी शहर. पण याच शहरातून सर्वात मोठ्या चोरीचा भयंकर प्रकार समोर आलाय. होय..चोरी..पैशाची किंवा दागिन्यांची नाही, तर डिझेलची चोरी. हो…जयपूरमध्ये झाली आहे आतापर्यंतची भयानक चोरी… चोरी कशी झाली, कोणी केली, हाच प्रश्न पडतोय ना? तर मग हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचाच.

पाईपलाईन घोटाळा अन् डिझेलवर डल्ला

जयपूरमध्ये हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पाइपलाइनमधून डिझेल चोरीचा एक अनोखा प्रकार उघडकीस आलाय. तिथे 15 फूट खोल बोगदा खोदून आणि पाइपलाइनला एक कॉक बसवून घरातून डिझेलची चोरी केली जात होती. चोरीला गेलेले डिझेल ड्रममध्ये भरून नंतर पिकअप व्हॅनमध्ये टाकून वेगवेगळ्या ठिकाणी पुरवलं जात होतं. संशय येऊ नये, म्हणून येथे वॉटर प्लांट बसवल्याचं नाटक करण्यात आलं होतं. पण हा चोरीचा भयंकर कारनामा केलाय…दाजी अन् मेव्हण्याच्या जोडीने.

जयपूरच्या बगरू पोलीस स्टेशन परिसरातील दहमुकला भागात भूमिगत पाईपलाईनमधून डिझेल चोरीला जात होतं. पण डिझेल येण्याचा प्रेशर कमी झाला अन् हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी डिझेल चोरीचा संशय आला. त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. ही तक्रार गांभीर्याने घेत पोलिसांनी तीन वस्त्यांमधील सुमारे एक हजार घरांची तपासणी केली. ही चौकशी अनेक किलोमीटरच्या परिसरात करण्यात आली. या चौकशीत जी धक्कादायक माहिती समोर आली, त्यामुळे पायाखालची जमीनच सरकली.

मेव्हणा-दाजीचा अफलातून मास्टरप्लॅन

पाईपलाईन गळतीची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या परिसरातून बाहेर पडणाऱ्या लाईनच्या आजूबाजूच्या घरांची झडती घेतली. पण त्यांना राजेश राहत असलेल्या घराची झडती संशयास्पद वाटली. 10 जून रोजी पोलिसांनी तेथे छापा टाकण्यात आला. झडतीदरम्यान घराच्या आत एक बोगदा आढळला. बोगद्याची झडती घेताना एक पाईपलाईन बाहेर येताना दिसली. ही पाईपलाईन 25 फूट अंतरावर एचपीसीएल लाईनकडे जात होती.हे लोक मुख्य लाईनमध्ये गळती करून डिझेल चोरत असल्याचा खुलासा झाला.

पोलीस तपासात डिझेल चोरी होत असल्याचं निष्पन्न झालं. परंतु चोरीसाठी जी टेक्निक वापरली गेली होती, ते पाहून पोलीसच चक्रावले. या चोरीचे मास्टरमाईंड आहेत श्रवण सिंग उर्फ ​​सरदार आणि त्याचा मेहुणा धर्मेंद्र वर्मा उर्फ ​​रिंकु. हे दोघेही मिळून जयपूरमध्ये डिझेल चोरीचं काम करत होते, या चोरीचे खरे सूत्रधार हे दोघेच होते. तर पोलिसांनी याप्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे, त्याचं नावं आहे. राजेश ओरंग, तो आसाममधील दिब्रुगड येथील रहिवासी आहे. तो दिल्लीतील कुख्यात तेल चोर श्रवण सिंग उर्फ ​​सरदार याच्या टोळीसाठी काम करत होता.

परंतु जयपूरमध्ये चोरी करण्यासाठी सरदार म्हणजेच श्रवण सिंगने अनोखी शक्कल लढवली होती. या टोळीने डिझेल चोरण्यासाठी एक घर भाड्यानं घेतलं होतं. त्यांनी घराच्या आत सुमारे 15 फूट बोगदा खोदला होता. पाईपलाईनमध्ये एक भोक करून त्यात एक व्हॉल्व्ह बसवला होता. व्हॉल्व्ह काढून तेल चोरी करायचे अन् नंतर पुन्हा व्हॉल्व्ह बसवायचे. दोघेही हे काम अत्यंत सफाईने करत होते. या घरातून बराच काळ त्यांचा हा व्यवसाय सुरू होता. एका मोठ्या ड्रममध्ये 1 हजार लिटर डिझेल येत असे, ते पिकअप व्हॅनद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी पुरवले जात असे.

जयपूरमध्ये आतापर्यंतची सर्वांत भयानक चोरी

संशय येऊ नये म्हणून, त्यांनी घराबाहेर पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. पाण्याच्या बाटल्यांचा व्यवसाय करतो, असं त्यांनी आजुबाजूच्या लोकांना सांगितलं होतं.
तर घरातूनच बोगदा बनवून पाईपलाईन टाकली होती आणि डिझेल चोरण्यास त्यांनी सुरुवात केली होती. या प्रकरणाती मुख्य आरोपी श्रवण सध्या फरार आहे. पोलीस आरोपी राजेशची चौकशी करत आहेत. घटनास्थळावरून एक पिकअपही जप्त करण्यात आलीय.

जयपूर पोलिस आयुक्तालयाच्या पश्चिम विभागाचे डीसीपी अमित बुडानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये या टोळीविरुद्ध भूमिगत पाईपलाईनमधून तेल चोरीचे 11 गुन्हे दाखल आहेत. जयपूर पोलीस आता मास्टरमाइंड श्रवण आणि त्याच्या मेहुण्यासह टोळीतील इतर सदस्यांना अटक करण्यासाठी छापे टाकत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी गेल्या 10 ते 12 वर्षांत जयपूर, अजमेर आणि हरियाणामध्ये अशा प्रकारे बोगदे बनवून तेल चोरी करत होते.

Disclaimer : जयपूरमध्ये आतापर्यंतची सर्वात भयानक चोरी झाली आहे. मेव्हणा अन् दाजीच्या टोळीने डिझेल चोरी केलं. परंतु चोरी करण्याची पद्धत ऐकून धक्काच बसेल.

Leave a Comment