Manikrao Kokate Remove From Agriculture Minister Post : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ फेरबदल झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलाय. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रालयाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. आता हे खाते मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. कृषी मंत्रालयाची जबाबदारी काढून घेतल्यानंतर कोकाटे यांना क्रीडा अन् युवक कल्याण विभाग देण्यात आला आहे. या खात्याची जबाबदारी याआधी गिरीश महाजन यांच्या कार्यक्षमतेत होती, मात्र आता ती कोकाटे यांच्याकडे देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
केकाळी ‘कृषी म्हणजे ओसाड गावची पाटीलकी’ म्हणणारे मंत्री आता राज्यातील तरूणांना ‘फिट’ ठेवणार. कारण त्यांच्याकडे क्रीडा अन् युवक कल्याण मंत्रालय आलंय. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झालाय. अखेर माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेण्यात आलंय. आता राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत. वादग्रस्त कृती अजिबात सहन केली जाणार नाही, ही शेवटची संधी, अशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळात तंबी दिली होती. सभागृहात रमी खेळणं, वादग्रस्त विधानं हे सगळं एका मंत्र्यासाठी पुरेसं नव्हतं का? राज्यभरातून आता हाच सवाल विचारला जातोय. खातेबदल म्हणजे शिक्षा की नव्याने बक्षीस? शिरसाट अन् योगेश कदमांसोबत देखील असंच होणार का? असे सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.
मंत्रिमंडळात फेरबदल का झाला?
कोकाटे यांच्या कृषी विभागातील कामकाजाबाबत वरिष्ठ नेतृत्व नाराज होतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपेक्षित निर्णय घेण्यात दिरंगाई, यंत्रणांवरील नियंत्रण कमी पडणं, तसेच विविध योजना राबवताना आलेली अडचण,या गोष्टींमुळे त्यांच्यावर ताशेरे ओढले जात होते. त्यामुळे त्यांच्याकडून हे खाते काढून घेण्यात आल्याची शक्यता आहे. विरोधकांनी हे मुद्दामहून झालेलं ‘डिमोशन’ असल्याचं म्हटलं आहे. विधानसभेत रमी खेळल्याच्या वादग्रस्त प्रकरणामुळे सरकारने जनतेचा रोष टाळण्यासाठी कोकाटेंना ‘क्रीडा व युवक कल्याण’ खातं देऊन बाजूला सारलं, असा आरोप विरोधकांकडून होतोय. सोशल मीडियावरही त्यांच्या खिल्लीचा विषय बनतो आहे.
दत्तात्रय भरणेंची चढती कमान
दत्तात्रय भरणे हे राज्यातील अनुभवी आणि शांत स्वभावाचे मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी सहकार, सार्वजनिक बांधकाम यांसारख्या खात्यांमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. कृषी मंत्रालय ही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्रालयाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या नेतृत्वात झालेला बदल भविष्यात कोणते धोरणात्मक निर्णय आणेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे, कोकाटे यांना दिलेलं क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय त्यांच्यासाठी ‘नवीन सुरुवात’ ठरेल का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेणं हा फक्त साधा खात्याचा फेरबदल नाही, तर यामागे ठळक राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं सावट असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र कोणतही खातं तेवढंच महत्त्वाचं असतं. क्रीडा खाते देखील युवांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कोणत्याही खात्यात गलथान कारभार होऊन सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असते, त्यामुळे खातेबदल केला म्हणजे आपण सुटलो असं समजून पुन्हा पहिले पाढे पंचावण्ण जर होणार असतील तर काय उपयोग, असा सवाल देखील नागरिक करत आहेत.
शिंदे गटात नाराजी?
शिंदे गटातील काही आमदारांमध्येही अस्वस्थता आहे, कारण कोकाटे हे अजित पवार गटाचे आहेत. त्यांच्याकडून महत्त्वाचं कृषी खाते काढून अजित पवार गटातील दत्तात्रय भरणे यांच्याकडेच देणं, हे युती बिघडल्याचं लक्षण मानलं जातंय. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा बदल भाजप चतुर खेळी करत डाव साधला. आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी शेतकरी नाराजी कमी करणे, अजित पवार गटाला खुश ठेवणे, आणि कोकाटेंच्या वादग्रस्त प्रतिमेपासून स्वतःला दूर ठेवणे, हे तीनही उद्देश यात साधले गेले आहेत. स्वतः माणिकराव कोकाटेंनी मात्र या बदलावर मौन साधलंय. ‘मंत्रालय हे जबाबदारीचं असतं, कुठलंच खातं लहान नसतं’ असं औपचारिक विधान त्यांनी केलीय. मात्र अंतर्गत नाराजी लपवली जात असल्याचं बोललं जातंय.
Disclaimer : फडणवीस मंत्रिमंडळात फेरबदल झाला आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आलंय. ही जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.