पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीचे शंखनाद, ढोल-ताशा जयघोषात स्वागत
मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांच्या वास्तूतून श्रीं ची मिरवणूक सकाळी १० वाजता निघाली. दरवर्षीप्रमाणे श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये विराजमान करण्यात आली होती. रास्ता पेठ पॉवर हाउस, अपोलो थिएटर चौक, दारूवाला पूल, देवाजी बाबा चौक, फडकेहौद मार्गे उत्सव मंडपात आगमन झाले.

मराठी अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी गणपतीचे आगमन
कलाकारांच्या घरी देखील आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन होत आहे. सर्वत्र आनंदाचे आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचे मुख्य कलाकार मराठी अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी गणपती बाप्पाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले आहे. त्यांनी गणेशोत्सवावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंत्री भरणे यांच्या हस्ते कुटुंबीयांसमवेत मोठ्या आनंदोत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गणपती बाप्पाच्या भोवती शेतातील विविध फळ भाज्या व कडधान्यांची आरास केली आहे. दरम्यान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सुख समृद्धी यश व चांगले दिवस येऊ दे अशी प्रार्थना गणपती बाप्पाला केली.

आमदार रवींद्र फाटक यांच्या घरी गणरायाचे आगमन
आमदार रवींद्र फाटक यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले. शुभकाशी फुलांची सजावट फाटक यांच्या घरी करण्यात आली आहे. सरकारने गणेशोत्सवाला विशेष दर्जा दिल्याने व गणेशोत्सव काळामध्ये भजन स्पर्धा आरास्य स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्याने यावर्षी गणेशोत्सवाला भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील चाकरमानी कोकणवासी यांना दोन दिवसापूर्वीच गणेशोत्सवाच्या आधी मोफत एसटी बस उपलब्ध करून देऊन गावी जाण्यास मदत केल्याने त्यांचे देखील आभार यावेळी रवींद्र फाटक यांनी मानले असून, आम्ही आमच्या घरचा गणपती हा घरातच विसर्जन करतो. कारण आमचे मूर्ती शाडू मातीचे असते. त्यामुळे आम्ही स्वतःपासूनच पर्यावरणाचे रक्षण करण्याची सुरुवात करतो. नागरिकांना संदेश देणे सोपे वाटते, असे मत रवींद्र फाटक यांनी व्यक्त केले.

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष निवासस्थानी गणरायाचे आगमन
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवानिमित्त आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांवरती येणारे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना गणराया चरणी त्यांनी केली.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कोथळी येथील निवासस्थानी गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे सह पत्नीक उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या निवासस्थानी आज गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यादेखील उपस्थित होत्या. यावेळी मोठ्या भक्ती भावाने गणरायाचे पूजन करण्यात आले आणि कोथळी येथील निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली.

आमदार सदाभाऊ खोत यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन
आमदार सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील निवासस्थानी आज सकाळी गणरायाचे उत्साहात आगमन झाले. गणरायाचे पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात सदाभाऊ खोतयांच्या घरी गणरायाचे आगमन झाले. यावेळी खोत कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी लाडक्या गणरायाचे आगमन
आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवसेना नेते जालना शहरातील दर्शना या अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी सालाबाद प्रमाणे या वर्षीही लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. या प्रसंगी आमदार अर्जुन खोतकर यांनी गणरायाची विधीवत पूजन करत आपल्या निवासस्थानी स्थापना केली आहे. सर्व देश वासियांना व मतदारसंघातील सर्व नागरिकांना गणपती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

धुळ्यातील गणेशोत्सवात अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची एन्ट्री
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे ह्या आज गणेश उत्सव निमित्ताने ABS ग्रुपच्या गणेशोत्सवासाठी धुळ्यात दाखल झाल्या. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक येथून ABS ग्रुपच्या गणरायाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी ABS ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी बोलताना सांगितले की, मुंबईतील गणेशोत्सव आणि धुळ्यातील गणेशोत्सव यामध्ये फार काही फरक नाही. सर्वच ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त उत्साह कायम असतो. त्यामुळे यंदाच्या गणेश उत्सवा दरम्यान मी गणेश चरणी प्रार्थना करते की, सर्वांना सुखी आयुष्याचे आशीर्वाद मिळू दे .असे साकड प्रिया बेर्डे यांनी गणरायाला घातले.