Maharastra politics : राज्यातील २६२ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज २ डिसेंबर मंगळवार रोजी सकाळपासून मतदानास सुरुवात झाली असून नागरिकांनी उत्साहाने मतदान केंद्रांवर धाव घेतली आहे. पहाटेपासूनच अनेक ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सुरक्षेची जोरदार तयारी केली आहे. (Maharastra politics)
Maharastra politics : पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात
सगळ्या मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस दल, होमगार्ड्स आणि सुरक्षा कर्मचारी नियुक्त आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमावबंदीचे नियम लागू करण्यात आले असून शिस्तभंग करणाऱ्यांवर तातडीने कारवाईची तयारी आहे.
छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या लढती असल्याने प्रशासन विशेष सावध झाले आहे. धाराशिवमधील तानाजी सावंत, राणा जगजीत सिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातील चुरशीच्या लढतीमुळे या भागांत पोलिसांनी गस्त वाढवली आहे. नाशिकमधील भगूर-सिन्नर आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये भाजप आणि शिंदे गट आमनेसामने असल्याने सुरक्षेवर खास लक्ष ठेवले जात आहे.
राज्यातील अडीच हजारांहून अधिक शासकीय कर्मचारी व मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात असल्यामुळे मतदान केंद्रांवर शांत, सुरक्षित आणि नियंत्रणातील वातावरण दिसत आहे. मतदारही निर्धास्तपणे मतदानाचा हक्क बजावत असल्याचे चित्र राज्यभर स्पष्टपणे जाणवत आहे.