Disclaimer : बीडच्या नारायणगडावर दसऱ्याच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हक्कांचं रणशिंग फुंकलं. तब्येत बिघडलेली, हाताला सलाईन लावलेली तरी व्यासपीठावरून त्यांनी आक्रमक भाषण ठोकलं. शेतकऱ्यांच्या हक्कांचा सवाल, ओल्या दुष्काळाची मागणी, उद्योगपती-नेत्यांकडून निधी उभारणीचा प्रस्ताव आणि पंकजा मुंडेंवर थेट टीका…
Manoj Jarange Patil Dasara Melavva At Narayangad : बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं. प्रकृती अस्वस्थ असूनही त्यांनी सभेला हजेरी लावली. एका हाताला सलाईन लावलेलं असतानाही ते व्यासपीठावर आले आणि हजारोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांसमोर आक्रमक भाषण केलं. यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्न, मराठा आरक्षण, ओला दुष्काळ जाहीर करणे आणि शासनाच्या धोरणांवर जोरदार तोफ डागली. आपल्या भाषणात जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, मराठा समाजासाठी योग्य आणि कायमस्वरूपी आरक्षण मिळाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही. त्यांनी राज्य सरकारला थेट आव्हान देत मागण्यांचा पवित्रा घेतला. हक्कासाठी लढताना काहीही करून दाखवू, पण समाजाच्या भविष्याशी तडजोड करणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
शेतकऱ्यांसाठी ठोस मागण्या
मनोज जरांगे यांनी सांगितलं की, राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. वावर, पिकं, जनावरं, घरं वाहून गेल्यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने भरपाई जाहीर करून ती प्रत्यक्षात देणं गरजेचं आहे. जरांगेंनी ठामपणे मागणी केली की, ज्यांचं पीक नष्ट झालं त्यांना प्रति हेक्टर ७० हजार रुपये आणि ज्यांचे शेत, पिकं वाहून गेली त्यांना 1 लाख 30 हजार रुपये मदत द्यावी. तसेच जनावरं वाहून गेलेल्या शेतकऱ्यांनाही 100 टक्के नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, असं ते म्हणाले. त्यांनी सरकारच्या पंचनाम्यांवर प्रश्न उपस्थित केले. “काही तज्ज्ञ अहवाल देतात, पण खऱ्या अर्थाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. म्हणून 100 टक्के पंचनामे करूनच भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी होती.
मनोज जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या.
- मराठवाडा आणि लगतच्या भागात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा – अन्यथा माघार नाही.
- दिवाळीपूर्वी निर्णय घ्या, अन्यथा लढा तीव्र होईल.
- शेतकऱ्यांना 70,000 रुपये हेक्टरी भरपाई द्या.
- पीकं जळालेल्या शेतकऱ्यांना – 1,30,000 रुपये भरपाई द्या.
- जनावरं, घरं, सोनं, पाईप, सोयाबीन, कापूस वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना – 100% भरपाई द्या.
- ऊसाचा एक रुपयाही कापू नका – गरीब शेतकरी उध्वस्त होईल.
- नोकरदार वर्गाच्या पगाराचा चौथा टक्का कापा
- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती.
- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्या. https://www.facebook.com/share/v/19hMoPm4J2/
- शेतीमालाला हमीभाव आणि नोकरीचा दर्जा द्या.
उद्योगपती आणि नेत्यांकडून निधी उभारणीचा प्रस्ताव
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, शेतकऱ्यांसाठी पैसा उभारायचा असेल तर त्याचे मार्ग आहेत. एक हजार लोकांच्या मदतीतून एखाद्या पक्षासाठी हजारो कोटी उभे राहतात, मग तोच पैसा शेतकऱ्यांकडे का जाऊ नये? असा सवाल त्यांनी केला. यासाठी त्यांनी उद्योगपती, मोठ्या मालमत्ता असणारे, राजकीय नेते आणि नामवंत कलाकार यांच्याकडून निधी उभारण्याचा प्रस्ताव मांडला. विशेष म्हणजे, जरांगे यांनी आपल्या भाषणातून एक वेगळी लिस्टच जाहीर केली. त्यांनी म्हटलं, मोठे कलाकार व उद्योगपती यांच्याकडून पैसे घ्या आणि तो निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरा. त्यांनी थेट अंबानी, अदानी, शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, तसेच शाहरुख खान यांचा उल्लेख करत, हे लोक मदत करू शकतात, पण त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा,” असं ठामपणे सांगितलं.
पंकजा मुंडेंवर हल्लाबोल
सभेत जरांगे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी तिच्या ‘गुलामीचं गॅझेट’ या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत विचारलं – ‘आमचं गुलामीचं गॅझेट आहे, पण इंग्रज तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या कुटुंबातला होता का? निवडणुकीपूर्वी समाजाला डवचतात, अपमानास्पद वक्तव्य करतात आणि नंतर काही महिने शांत बसतात. मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका. जर आम्हाला गुलामीची औलाद म्हटलं, तर तुम्ही स्वतः काय आहात? असं तीव्र शब्दात त्यांनी विचारलं.
आरक्षणाच्या लढाईचा निर्धार
जरांगे पाटील यांनी आठवण करून दिली की, सहा कोटी मराठा समाजाच्या मुला-मुलींचं भविष्य सुरक्षित करणं ही आपली जबाबदारी आहे. शेतीबरोबर आरक्षण मिळालं पाहिजे, नाहीतर मराठ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मुंबईतील आंदोलनातून आपण जीआर मिळवला, आता दिवाळीपर्यंत शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात. अन्यथा मराठा समाज मोठं आंदोलन उभारेल.
सभेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, खूप सहन केलं, आता मराठ्यांकडे घरात घुसून हाणायची ताकद आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचलं. आपण पुढच्या आंदोलनासाठी महिना-पंधरा दिवस थांबू, पण जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर जिल्हा परिषदेसह एकाही जागेवर सरकारला निवडून येऊ देऊ नका. मंत्र्यांच्या सभा महाराष्ट्रात होऊ देऊ नका.
तब्येत ढासळली, तरी हजेरी लावली
विशेष म्हणजे, सभेच्या आदल्या दिवशीच जरांगे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. त्यामुळे मेळावा होईल की नाही, अशी चर्चा होती. मात्र, शरीर थकलं असतानाही आणि हातात सलाईन लावलेलं असतानाच ते लोकांसमोर आले. त्यांनी खुर्चीवर बसून भाषण केलं. मला बोलायला त्रास होतोय, पण गड नगद असल्यामुळे ताकद मिळते, असं सांगून समाजाच्या लढाईत शेवटपर्यंत सोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.