खड्ड्यांवर रांगोळी काढून मनसेचे महापालिकेविरोधात आंदोलन

MNS Protests Against Potholes : कल्याण शहरातील रस्तांना खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरु झाला आणि या खड्ड्यामध्ये पाणी साचत आहे. वर्दळीच्या ठिकाणी मुख्य रस्तांची दयनीय अवस्था झाली आहे. उखडलेले रस्ते आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. रोज वाहनांची होणारी ये-जा, विद्यार्थी, महिला, वृद्धांना या रस्तांवरुन जाताना जिव मुठीत घेऊन चालावं लागतं. या त्रासाला अक्षर:शा नागरीक कंटाळले आहेत.

मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलं आंदोलन

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बुधवारी उल्हासनगर महापालिकेविरोधात एक अनोखा आणि लक्षवेधी आंदोलनप्रकार केला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांवर रांगोळी काढून आणि जोरदार घोषणाबाजी करत मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. “हा विकास की विनाश?”, “मनपा हाय-हाय”, “खड्ड्यांपासून मुक्तता द्या” अशा घोषणा देत आंदोलकांनी रस्त्यांवरील दुरवस्थेचे चित्र स्पष्ट केले.

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले

या आंदोलनाचे नेतृत्व मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि शहराध्यक्ष संजय घुगे यांनी केले. यावेळी जिल्हा संघटक दिलीप थोरात, उपशहराध्यक्ष सचिन बेंडके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. दरम्यान, आंदोलकांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवले असताना सेंट्रल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन आंदोलनाची सांगता केली.

Disclaimer : वरील बातमी समाजहितासाठी आणि जनजागृतीच्या उद्देशाने दिली गेली आहे. या बातमीत वापरलेली माहिती विविध सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित आहे.

Leave a Comment