Bachchu Kadu : उपोषणामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावत आहेत. परंतु त्यांनी मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतलेली आहे. आजवर त्यांची राजकीय कारकिर्द कशी राहिली ते आपण पाहू या.
Bachchu Kadu Hunger Strike Political Journey : प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी अन् दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून, अन्नाचा एकही कण त्यांच्या पोटात गेलेला नाही. त्यामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावत असल्याचं समोर येतंय. चार किलो वजन घटलं असून कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या या उपोषणाला माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी देखील पाठिंबा दिला आहे.
बच्चू कडू यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत?
• शेतमालाच्या किमान दरावर 20 टक्के अनुदान
• आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ आणि 10 लाखाची आर्थिक मदत तसेच संपूर्ण कर्जमाफी
• दिव्यांग आणि विधवा महिलांना 6000 रुपये मानधन द्या
• ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष, किमान 5 लाख अनुदान मिळावे
• धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू करणे
• धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13 टक्के आरक्षण
कसा सुरू झाला प्रवास?
गरिबांचा रॉबिनहुड आणि अंध अपंगांचा आधारवड म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे, ते म्हणजे बच्चू कडू. शेतकरी ते प्रत्येक उपेक्षित घटकासाठी आवाज उठवणारे नेते म्हणजे बच्चू कडे. विदर्भातील अचलपूर मतदारसंघाचे आमदार, बच्चू कडू सर्वांनाच परिचित आहेत. पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन करणारे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारलाच घाम फोडणारे ते एकमेव आमदार आहेत. प्रहार पक्षाची आज सर्वांनाच धास्ती वाटतेय, याला कारण बच्चू कडूंचा निर्भीडपणा आहे. परंतु त्यांचं राजकीय गणित नेमकं काय आहे?
बच्चू कडूंचं बालपण
मरावतीमधील चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा नावाचं गाव आहे. याचं गावात बच्चू कडूंचा जन्म झाला आहे. आंदोलनाचा वसा त्यांनी काही आज घेतलेला नाही, तर इयत्ता आठवीत असताना बच्चू कडूंनी तमाशा बंदीसाठी, तरूणांना बरबाद होण्यापासून वाचविण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यांच्या सगळ्यांना थेट भिडण्याचा प्रवास शालेय वयातूनच सुरू झाला होता. बच्चू कडूंचा राजकीय जीवनाची सुरूवात मात्र शिवसेनेपासून झाल्याचं समजतंय.
राजकारणात एन्ट्री
प्रहारचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दोन आमदार निवडून आले होते. यामध्ये एक बच्चू कडू होते, तर दुसरे मेळघाटचे राजकुमार पटेल होते. बच्चू कडूंचा फोकस हा शेतकरी, कष्टकरी, अपंग वर्गावर आहे. त्यामुळेच त्यांची जमिनीवरचा कार्यकर्ता अशी ओळख निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा बच्चू कडूंवर मोठा प्रभाव होता, असं सांगितलं जातं. सुरूवातीला ते शिवसेनेचे चांदूरबाजार समितीचे सभापती झाले होते. त्यावेळी त्यांनी शौचालय घोटाळा उघडकीस आणला होता. परंतु पुढे अपंगांना सायकल वाटप करण्यासाठी निधी दिला नाही, यावरून त्यांचा शिवसेना नेत्यांशी वाद होवून ते शिवसेनेबाहेर पडले.
बच्चू कडू यांनी 1999 मध्ये देखील विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. 2004 साली लोकसभेची निवडणुकीत सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यांनी हार मारली नाही. ते पुन्हा कंबर कसून उभे राहिले अन् त्यानंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल उधाळला. आमदार झाल्यानंतर बच्चू कडूंनी प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली. 2004 पासून सलग चारवेळा (2004, 2009, 2014 आणि 2019) बच्चू कडू अचलपूर मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेत.
आंदोलनं स्टंटबाजी नाही, पॉवर पॉलिटिक्स
आंदोलनं स्टंटबाजी म्हणून नाही तर पॉवर पॉलिटिक्स म्हणून करायची असतात, हे बच्चू कडूंकडे पाहिल्यानंतर कळतंय. आदिवासी कसत असलेली शेतजमीन त्यांच्या नावावर करण्याचा शासन आदेश होता, तरी देखील त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे त्यांनी स्वत:ला जमिनीत अर्ध गाडून घेत आंदोलन केलं होतं. एकदा तर आदिवासी समाजाला वनपट्टे देण्यामध्ये दिरंगाई केल्याने त्यांनी थेट अधिकाऱ्याच्या घरात साप सोडून आंदोलन केलं होतं. अधिकारी सतत गैरहजर राहत असल्यामुळे त्यांनी थेट खुर्ची लिलाव आंदोलन केलं होतं. कापसाला बाजार भाव नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक मुंडन, दारूबंदीसाठी दारूंच्या दुकानासमोर दूध वाटप आंदोलन, केवळ आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्यांवर काळ्या रंगाचे पट्टे मारून आंदोलन, रक्षाबंधन आंदोलन, विदर्भ मिल आंदोलन, जंगल बुक आंदोलन, च्याव म्याव आंदोलन, शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन असे अनेक आंदोलन बच्चू कडू यांच्या नावावर आहेत.