Rain update : महाराष्ट्रात ठिकठिकाणी (maharastra rain) पाऊस पडतोय. आठवड्याभराच्या विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा बरसायला लागला. ऑगस्टमध्ये समाधानकारक झालेल्या या पावसामूळे नद्या नाले तूडूंब भरुन वाहताय. पण काही भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ नुकसान झालं. आज राज्यात कुठे, किती पाऊस झाला. काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात.

आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात सर्वदुर मुसळधार पावसाची हजेरी
आठवडाभराच्या विश्रांती नंतर गोंदिया (gondia) जिल्ह्यात आज सकाळी मुसळधार पावसाने (heavy rain) हजेरी लावली. साधारणतः 1 तास बसलेल्या या पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. तर या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी करपलेल्या धान पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे
नाल्यातील पाणी तिरुमला इस्टेट भागात सोडल्याने नागरिकांना त्रास
नांदेड (nanded city) ते पूर्णा हायवे वरती सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्यांचे बांधकाम केले असून, त्या नाल्यातील पाणी तिरुमला इस्टेट (tirumala estet) या भागात सोडण्यात आल्याने नागरिकांना या कामाचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या नागरिकांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करून देखील याचा पर्यायी मार्ग काढण्यात आला नसल्याने नागरिकांचे आरोग्य (health) धोक्यात आले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या निवेदनाची दखल घेऊन सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये, अशी विनंती नागरिकांनी प्रशासनाला केली आहे.
बीड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात
बीड (beed) शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर अचानक जोरदार मुसळधार सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरात जोरदार पावसामुळे सखोल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. दरम्यान, यामुळे गाव खेड्यातील नद्यांना पूरस्थिती आल्याचा देखील पाहायला मिळत आहे.
विजांच्या गडगडाटासह भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी
मागील दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज भंडाऱ्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार हजेरी लावली. पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नाही असे भात पीक उत्पादक शेतकरी चिंतातूर झाले होते. काही भागात पावसाने अल्प हजेरी लावल्याने भातपीक करपायला लागले होते. तर प्रचंड उखड्याने नागरिकही बेजार झाले होते. गणरायाच्या (ganpati bappa) आगमनानंतर पावसाने लावलेल्या हजेरीन सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात (sindhudurg) आज संध्याकाळी दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. कुडाळ तालुक्यातील हातेरी नदीवर गणरायाचे “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात आरती करीत विसर्जन करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. नांदेड, लातूर आणि बिदर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे लेंडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने लेंडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणाच्या सर्वच दरवाज्यातून लेंडी नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लेंडी नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदी लेंडी नदी लिंबोटी धरणाच्या आसपासच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराच्या पाण्यात कोणीही प्रवास करू नये, असे देखील आवाहन करण्यात आले आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यात ढगफुटीमुळे चिखली गाव पाण्याखाली गेले. चिखली गावातील घरात पाली शिरले. नांदेड मध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात देखील पाणी शिरलं. यावेळी माणिकराव ठाकरे व खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाहणी करत लोकांना सुरक्षित जागेवर जाण्यास आवाहन केले आहे.
बीड जिल्ह्यात पुन्हा पाऊस; मांजरा धरणाचे 6 दरवाजे पुन्हा एकदा उघडले
बीड जिल्ह्यातील काही भागात पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय. यामुळे बीड, लातूर धाराशिव या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या, बीडच्या धनेगाव येथील मांजरा धरणाचे 6 दरवाजे पुन्हा एकदा उघडले असून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीत सुरू आहे. यामुळे बीड, लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मांजरा प्रकल्प सध्या 99.21 % क्षमतेने भरला असून, पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने 6 दरवाजे उघडले आहेत. याद्वारे 0.25 मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात 10,482.84 क्यूसेक्स (296.88क्यूमेक्स )इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. दरम्यान, मांजरा नदी काठावरील गाव, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पुरनियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगाव याच्या वतीने करण्यात आले आहे.