रिव्हॉल्व्हर राणी, राजकारण अन् सन्मान…पेट्रोल पंपावर रिव्हॉल्व्हरचा थरार; तरुणीचा व्हिडिओ व्हायरल, कॉंग्रेसने दिला पाठिंबा

रिव्हॉल्व्हर राणी, राजकारण अन् सन्मान...पेट्रोल पंपावर रिव्हॉल्व्हरचा थरार; तरुणीचा व्हिडिओ व्हायरल, कॉंग्रेसने दिला पाठिंबा

Uttar Pradesh viral video Petrol pump revolver incident Congress support to Ariba: मागील काही दिवसांत समाजातील वाढत्या संतापामुळे अनेक चिंताजनक घटना घडल्या. रागाच्या भरात संयम गमावल्यामुळे हत्येच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली होती. एका तरुणीने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला रिव्हॉल्व्हर दाखवत धमकावलं. त्यानंतर कॉंग्रेस नेत्यांनी या तरूणीच्या घरी जावून तिचा सत्कार केलाय. याप्रकरणी एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. आपण या संपूर्ण घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

फिल्मी शैलीत रिव्हॉल्व्हरने धमकावलं

उत्तर प्रदेशातील हरदोई येथे एका तरूणीने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला फिल्मी शैलीत रिव्हॉल्व्हरने धमकावल्याचा हा व्हिडिओ होता. गाडीत सीएनजी भरत असताना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले असता, संतप्त झालेल्या तरूणीने थेट पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या छातीवर रिव्हॉल्व्हर लावला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बिलग्राम पोलीस स्टेशन परिसरातील एका पेट्रोल पंपावर घडली. पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीप्रमाणे, तो दररोजप्रमाणे वाहनांमध्ये सीएनजी भरत होता, तेव्हा शहााबादमधील मोहल्ला गिगियानी येथील रहिवासी एहसान खान त्याच्या कुटुंबासह त्याच्या कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी आले. सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांनी सर्व लोकांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. घटनास्थळी लोक जमले, प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. त्यानंतर अरिबा रागाच्या भरात गाडीकडे धावली आणि तिच्या वडिलांची पिस्तूल बाहेर काढली. तिने पंप कर्मचाऱ्याच्या छातीला पिस्तूल लावला.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

इतक्या गोळ्या झाडेल की, कुटुंबातील सदस्य तुला ओळखण्यास नकार देतील, अशी धमकी सुद्धा अरिबाने दिली. अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्व पेट्रोल पंप कर्मचारी घाबरले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बिलग्राम पोलिसांनी कारवाई देखील केली. उत्तर प्रदेशातील हरदोई येथे पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्व्हर रोखणारी तरूणी सध्या प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रिव्हॉल्व्हर आणि परवाना जप्त केला आहे. एकीकडे या तरूणीवर जोरदार टीका होत आहे, तर दुसरीकडे तिला खूप आदर दिला जात आहे.

‘लडकी हुं, लडकी सक्ती हुं’

पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्व्हर दाखवल्याच्या प्रकरणात आता राजकारण सुरू झालंय. रिव्हॉल्व्हर दाखवून आपली शक्ती दाखवणाऱ्या तरूणीला काँग्रेसने राणी लक्ष्मीबाई सन्मानाने सन्मानित केले आहे, तर प्रियंका गांधी यांचे ‘लडकी हूँ लड शक्ति हूँ’ हे घोषवाक्य खरं असल्याचं म्हटलंय. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्व्हर दाखवणाऱ्या अरिबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम पांडे त्यांच्या टीमसह शहााबाद येथील अरिबाच्या घरी पोहोचले. त्यांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा फोटो देत अरिबाचा सन्मान केला. यादरम्यान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम पांडे म्हणाले की, अरिबाने प्रियंका गांधींचे ‘लडकी हुं, लडकी सक्ती हुं’ हे घोषवाक्य खरं असल्याचं सिद्ध केलंय. अरिबाचे कौतुक करताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणाले की, मुलींनी त्यांच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यात मागे हटू नये.

काँग्रेस प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत…

त्यांनी अरिबाचे वडील अहसान यांना पक्षाच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले. गरज पडल्यास काँग्रेस प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत उभी राहील, असं देखील सांगितलं आहे. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्व्हर दाखवणारी मुलगी अरिबा शिक्षण घेत आहे. तिने नुकतीच नीट परीक्षा दिली आहे. तिला पाठिंबा देत काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम पांडे यांनी पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी लवकरच अरिबाशी संपर्क साधतील. गरज पडल्यास हा मुद्दा संसदेतही उपस्थित केला जाईल.

अरिबा आणि एहसानविरुद्ध गुन्हा

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंप कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून अरिबा आणि एहसानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची पिस्तूल जप्त करण्यात आली. दोन दिवसांनंतर, या संपूर्ण प्रकरणात अरिबा आणि तिच्या वडिलांचे जबाब समोर आले. त्यांनी सांगितले की, पंप कर्मचाऱ्याने त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. तो मद्यधुंद अवस्थेत होता. गाडीत एक महिला असूनही, तो सीएनजी भरताना गैरवर्तन करत होता. त्यांनी कबूल केले की पिस्तूल काढणे बेकायदेशीर आहे. एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनीही अरीबा खान आणि एहसान खान यांच्याशी फोनवर संवाद साधला. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलंय.

Disclaimer: उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणीने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावले. सीएनजी भरताना सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे वाद झाला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.

Leave a Comment