Vitthal Murti Pandharpur Or Madha Controversy: आषाढी एकादशीचे वेध लागले आहेत. अनवानी पायांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविक पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. आषाढ महिन्यातील एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी पर्वणीच! संतांच्या अभंगांचे सूर, टाळ-मृदुंगाचा गजर आणि मुखात “विठोबा रुख्मिणी”चा गजर करत भाविकांची वारी पंढरीकडे निघाली आहे. पावसाचे थेंब अंगावर झेलत, ओठांवर हरिपाठ घेऊन, शेकडो किलोमीटरचा प्रवास विठुरायाच्या दर्शनासाठी सुरू झाला आहे.
पंढरपूरचा विठ्ठल खरा नाही, हो पण हे मी नाही तर इतिहासकार सांगत आहेत. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरहून एकदा नाही तर, बऱ्याचदा हलवण्यात आलीय. त्यामुळे आता ज्या विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा केली जात आहे, ती मूळ मूर्ती नसल्याचं म्हटलं जातंय. ऐकून थोडा धक्का बसला ना? पण या दाव्याला खरे ठरवणारे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. पण कुठे आहेत हे पुरावे? जर हे पुरावे खरे असतील तर मग मूळ मूर्ती कुठे आहे? असे सवाल उपस्थित होत आहेत.
विठ्ठलाची मूळ मूर्ती कुठे आहे?
सोलापूरच्या माढा गावातील मूर्ती हीच विठ्ठलाची मूळ मूर्ती असल्याचं समजलं जातंय. खरं तर पंढरपूर येथे असलेली विठ्ठलाची मूर्ती अन् माढा येथे असलेली मूर्ती या दोन्हींमध्ये बराच फरक आहे. अनेक संत माहात्म्यांनी जे वर्णन केलंय, ते माढा येथे असलेल्या मुर्तीशी तंतोतंत जुळतं. पंढरपूरच्या विठ्ठलाशी नाही. पंढरपूर येथे असलेली मूळ मूर्ती खरी आहे किंवा नाही, यावर इतिहासकार डॉ. सतीश कदम यांनी अभ्यास केलाय.
त्यांनी दिलेल्या माहितीवरून पंढरपूरवरून विठ्ठलाची मूर्ती अनेकदा हलवण्यात आली होती. 1513 मध्ये निजामशहा अन् आदिलशाहाचे देखील हल्ले झाले होते. तेव्हा देवाला धक्का लागू नये म्हणून विजयनगरचा राजा कृष्ण देवराय यांनी विठ्ठलाची मूर्ती विजनगरमध्ये नेली. त्यानंतर 1530 मध्ये निजामशाह अन् आदिलशाह आणि कुतुबशाह या तिघांनी विजयनगरवर हल्ला केला. तेव्हा संत एकनाथ यांचे आजोबा संत भानुदास यांनी विठ्ठलाची ती मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणली. हे सगळं भानुदासांनी त्यांच्या अभंगात लिहून ठेवलंय. त्यानंतर 1659 मध्ये अफजलखान छत्रपती शिवाजी महाराजांना आव्हान देण्याच्या हेतुने सगळ्या मंदिरात जावून तोडफोड करत होता. तेव्हा पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरच्या बडव्यांनी पंढरपूरहून 20 मैल लांब सोलापूर मधल्या माढा येथे नेली. जेणेकरून अफजल खान देवाला काही हानी पोहोचवू शकणार नाही.
इतिहासातील पुरावे काय सांगतात?
अफजल खानच्या वधानंतर पुन्हा ती पंढरपूरला आणली गेली. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. 1681 मध्ये औरंगजेबाने उत्तर भारतावर कब्जा केला होता. जवळपास त्याचा चार वर्ष मुक्काम पंढरपूरजवळ असलेल्या ब्रम्हपुरी गावात होता. त्यामुळे पुन्हा विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरजवळ असलेल्या देवांगमध्ये असलेल्या पाटलाच्या एका विहिरीत नेवून ठेवली होती. त्यानंतर मुघल माघारी गेल्यानंतर मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणली गेली.
नंतर पंढरपूरच्याच दोन बडव्यांनी ही विठ्ठलमूर्ती चोरली होती. पण नंतर ती सापडून पु्न्हा मंदिरात बसवली. नंतर एका बैराग्याने विठ्ठल मूर्तीच्या पायावर दगड मारला होता. ज्यामुळे मूर्ती भंग पावली होती. अशा प्रकारे अनेकदा मूर्ती हलवली गेली, चोरीला गेली. मूर्तीला हानी पोहोचविण्याचा देखील अनेकदा प्रयत्न झाला. अशी परिस्थितीत मूळ मूर्ती कायम राहण्याची शक्यता खूपच कमी आहे, हे सगळं संशोधन डॉ. सतीश कदम यांचं आहे.
पंढरपूरची मूर्ती खरी की खोटी?
इतिहासकार रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी 1980 साली केलेलं वक्तव्य काहीसं वादग्रस्त ठरलं होतं. त्यांनी वेगवेगळे दाखले मांडत, अभ्यास करत सांगितलं होतं की, पंढरपूरमध्ये असलेली मूर्ती ही मूळ यादवकालीन विठ्ठलमूर्ती नाही. परंतु इतिहासात जसं वर्णन सांगितलंय ते माढातील विठ्ठलमूर्तीशी मिळतं जुळतं आहे. तर संत सावता माळी यांनी साधारण इ.स. बाराशेमध्ये विठ्ठलाच्या छातीवर मंत्र असल्याचा उल्लेख केलाय. आता जी मूर्ती पंढरपूरमध्ये आहे, तिच्या छातीवर कोणतेही मंत्र लिहिलेले नाही. तर हे सगळं वर्णन माढा येथे असलेल्या विठ्ठल मूर्तीशी जुळतंय. तर 1805 पर्यंत विठ्ठलाची मूळ मूर्ती पंढरपूरमध्ये होती, असं ढेरे यांनी सांगितलं होतं. केसरीमध्ये त्यांनी दोन लेख लिहित त्यांनी हे संपूर्ण संशोधन मांडलं होतं. पंढरपूरची मूर्ती खरी की खोटी? यावर अनेक वर्षानुवर्षे वाद झाले आहेत.