What Is Importance Of Neera Snan In Ashadhi Wari 2025: आषाढी वारीत ‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामाच्या जयघोषात नीरा स्नान पार पडते.
टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येते. नीरा स्नानानंतर माउलींचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याचा निरोप घेतो.
सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे पालखी मुक्कामासाठी रवाना होताच नीरा नदीच्या पवित्र पात्रामध्ये माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येते. यावेळी सर्व वारकीर माउली भक्तांनी ‘माउली-माउलीऽऽऽ’ असा मोठ्याने जयघोष करत असतात. टाळ-मृदंगाच्या आवाजाने नीरा नदीचं पात्र दुमदुमतं.
दत्तघाटावर माउलींच्या पादुकांना स्नान
माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये नीरास्नानाला अत्यंत महत्त्व आहे. माऊलींचा पालखीसोहळा सुरू करण्यात हैबतबाबांची मोठी भूमिका आहे. त्यांची जन्मभूमी सातारा आहे. पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पूर्ण झाला की, पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदीच्या दत्तघाटावर माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येते. यावेळी हजारो वारकरी उपस्थित असतात. जेव्हा पालखी सोहळ्याचा जुन्या नीरा पुलावरून दत्तघाटावर प्रवेश होतो, तेव्हा माउलींच्या स्वागतासाठी रांगोळीबरोबर वाद्यांचा निनाद सुरू असतो. टाळ-मृदंगाच्या जयघोषात माउलींच्या पादुका स्नानासाठी फुलांच्या पायघड्या देखील घातल्या जातात.
सोहळ्याला एक नवी ऊर्जा मिळते
परंपरेप्रमाणे नीरा नदीकाठी थोडा विसावा घेतला की, माउलींच्या पादुकांचे स्नान दत्त घाटावर सुरू होते. अनेकदा यावेळी वरुणराजा देखील हजेरी लावतो. माउलींबरोबर वारकरी आणि भक्तांचेही नीरा नदीत स्नान होते. त्यानंतर सोहळ्याला एक नवी ऊर्जा मिळते.
आषाढी वारीत नीरा स्नानाला अत्यंत महत्त्व आहे. आषाढी वारीमध्ये जेव्हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या निरा नदीच्या काठी पोहोचतात. यावेळी, पादुकांना नीरा नदीच्या पाण्यात स्नान घातले जाते, ज्याला ‘नीरा स्नान’ म्हणतात. हे स्नान वारकरी संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जाते. त्याला खूप धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. नीरा नदीला वारकरी संप्रदायात पवित्र मानले जाते. या नदीच्या पाण्यात पादुकांना स्नान घातल्याने ते अधिक पवित्र होतात, अशी श्रद्धा आहे.
परंपरा
नीरा स्नान ही एक पारंपरिक आणि धार्मिक परंपरा आहे, जी अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. आषाढी वारीमध्ये नीरा स्नान हे वारकरी संप्रदायासाठी एक महत्त्वाचा विधी आहे. वारकरी भक्त या स्नानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि भक्तिभावाने या विधीमध्ये सहभागी होतात. नीरा स्नान, पालखी सोहळ्याचा एक अविभाज्य भाग आहे. वारकरी लोकांची अशी श्रद्धा आहे की, नीरा स्नानामुळे त्यांना पुण्य मिळते आणि त्यांचे जीवन सुखमय होते. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना आषाढी वारीच्या एकूण मार्गांमध्ये तीन वेळा स्नान घातलं जातं. माऊलींच्या पादुकांना सगळ्यात आधी आळंदीतून प्रस्तान होण्याआधी इंद्रायणी नदीमध्ये स्नान घातलं जातं. त्यानंतर निरा नदीमध्ये स्नान घातलं जातं. त्यानंतर शेवटी पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीत माऊलीच्या पादुकांना स्नान घातलं जातं.
नीरा स्नान म्हणजे काय?
वारीत निघालेल्या पालख्यांचा मुक्काम जेव्हा नीरा नदीच्या आसपासच्या भागात (उदा. नीरा नरसिंहपूर) होतो, तेव्हा वारकरी भाविक नदीत स्नान करतात. या स्नानाला नीरा स्नान असे म्हटले जाते. याला पवित्रता, भक्ती, आणि शरीरशुद्धी यांचे प्रतीक मानले जाते.इतिहासदृष्ट्या, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला 1820 च्या दशकात औपचारिक रूप मिळाले. त्यानंतर पालखीचा निश्चित मार्ग ठरला. या मार्गात नीरा नदी आली आणि त्या ठिकाणी भाविक स्नान करू लागले. स्नानाची परंपरा एक भक्तिपूर्वक विधी म्हणून रूढ झाली.
नीरा स्नानाचे महत्त्व
- वारकरी नीरा नदीला गंगा समजतात. नीरा स्नान म्हणजे गंगास्नान, ही श्रद्धा दृढ आहे.
- नीरा नदीचं पावित्र्य जपण्याची भावना निर्माण होते. त्यामुळे पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होते.
- संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या वारकऱ्यांनी चालवलेल्या पवित्र परंपरेचा हा भाग आहे.
- विविध जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन एकाच पवित्र नदीत स्नान करतात, यातून समतेचा संदेश दिला जातो.
- एकत्र स्नान, भजन आणि संवाद यामुळे वारकऱ्यांमधील बंध सशक्त होतात.
- अशा परंपरांमुळे लहानपणापासूनच नवीन पिढीत नदीप्रेम आणि तिची जपणूक करण्याची भावना तयार होते.
Disclaimer: आषाढी वारीत नीरा स्नान ही एक खास परंपरा आहे. सर्व वारकऱ्यांसाठी तो एक मोठा सोहळा आहे. आपण या स्नानाचं महत्त्व जाणून घेऊ या.