श्रावणात मांसाहार का टाळतात? धार्मिक, वैज्ञानिक कारणं सविस्तर घ्या जाणून…

श्रावण महिन्यात मांसाहार टाळला जातो. यामागे कोणते धार्मिक, वैज्ञानिक कारणे आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.

Why People Aavoid Non Veg Food During Shravan : महाराष्ट्रात 25 जुलै 2025 पासून श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे. भारतीय पंचांगानुसार हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. निसर्गाचा सौंदर्यशोभा, मुसळधार पाऊस, हिरवळ, आणि भक्तीचा माहोल या महिन्याला वेगळंच महत्त्व देतो. विशेषतः भगवान शिवाच्या भक्तांसाठी हा महिना श्रद्धा, संयम आणि शुद्धतेचा काळ मानला जातो. श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार, अंडे, लसूण-कांद्यासारखे तामसिक अन्न टाळतात. अनेकांना वाटतं की, ही फक्त धार्मिक परंपरा आहे, पण यामागे वैज्ञानिक आणि आरोग्याशी निगडित कारण देखील आहेत. यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊ या.

धार्मिक संदर्भ आणि आयुर्वेद

श्रावण महिना भगवान शिवाला अर्पण केलेला मानला जातो. या काळात भक्त उपवास करतात, मंदिरात जाऊन पूजाअर्चा करतात. सात्विक जीवनशैली अंगीकारतात. मांसाहारासारखं तामसिक अन्न मन आणि शरीरावर अशुद्धतेचा प्रभाव टाकतं. अशा अन्नामुळे राग, आळस, अस्थिरता आणि नकारात्मक विचार वाढतात, जे भक्तीमय वातावरणाशी विसंगत मानले जाते. म्हणूनच, या महिन्यात शुद्धता राखण्यासाठी तामसिक अन्न त्याग केला जातो. आयुर्वेदानुसार अन्नाचे तीन प्रकार असतात – सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक अन्न मन आणि शरीराला शांती देते, तर तामसिक अन्न राग, आळस आणि मानसिक असंतुलन निर्माण करू शकतं. श्रावण महिन्यात सात्विकतेकडे झुकणं केवळ धार्मिक कारणाने नव्हे, तर मानसिक स्वास्थ्यासाठीही उपयुक्त मानलं जातं.

वैज्ञानिक आणि आरोग्य

श्रावण महिना पावसाळ्याच्या मध्यात येतो. या काळात हवामान दमट आणि आर्द्र असतं, ज्यामुळे बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशीजन्य संसर्ग वाढतो. मांसाहारी अन्न लवकर खराब होतं आणि त्यात रोगजंतू वाढण्याचा धोका अधिक असतो. यामुळे फूड पॉयझनिंग, उलट्या, अतिसार, ताप, आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात.

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती कमजोर होते. मांसाहार हे जड आणि चरबीयुक्त अन्न असल्याने ते पचायला वेळ लागतो. पचन न झाल्यास यकृत, आतडं आणि रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत होते. त्यामुळे श्रावण महिन्यात हलकं, शुद्ध आणि पचायला सोपं अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. श्रावणात मांसाहार टाळण्यामागे केवळ धार्मिक कारणं नाहीत, तर शरीर, मन आणि आरोग्याची काळजी घेण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. सात्विक अन्नामुळे शरीरात शुद्धता येते, मन शांत राहतं आणि रोगप्रतिकारक शक्तीही चांगली राहते. म्हणूनच या महिन्यात शाकाहार, संयम आणि स्वच्छतेकडे लक्ष देणं हे प्रत्येकाच्या हिताचं ठरतं.

श्रावणात मासांहार का टाळतात?

1. आयुर्वेदामध्ये ऋतूनुसार आहार आणि जीवनशैली यावर भर दिला जातो. पावसाळा हा ऋतू शरीरातील त्रिदोषांपैकी वात आणि पित्त वाढवतो. मांसाहार केल्यास हे दोष अजून वाढतात. ते सर्दी, त्वचाविकार, अपचन आणि थकवा निर्माण करू शकतात. म्हणूनच, या काळात शरीराला आराम देणारा आणि संतुलन राखणारा शाकाहार हितावह मानला जातो.

2. पावसात मांस साठवणूक, वाहतूक आणि स्वयंपाक करताना स्वच्छता राखणं खूप कठीण असतं. यामुळे मांसात सहजपणे कृमी, फंगस किंवा बॅक्टेरिया वाढू शकतात. उकडून किंवा तळूनही काही सूक्ष्मजीव नष्ट होत नाहीत, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

3. आयुर्वेद आणि योगशास्त्र मानतात की अन्नाचा थेट परिणाम मनावर होतो. सात्विक अन्न मन शांत, स्थिर आणि प्रसन्न ठेवतं, जे भक्ती, ध्यानधारणा किंवा पूजेसाठी अनुकूल असतं. तामसिक अन्नामुळे अस्वस्थता, चिडचिडेपणा आणि असंयम वाढू शकतो, म्हणून श्रावणात मानसिक शुद्धतेसाठीही शाकाहार श्रेयस्कर ठरतो.

4. हिंदू धर्मात प्रत्येक प्राणी आणि वनस्पतीमध्ये दिव्यत्व मानलं जातं. श्रावण महिन्यात पर्यावरणाचा जास्त विचार केला जातो. झाडे लावणे, नदीची पूजा करणे, जनावरांना अन्न-पाणी देणे यासारख्या उपक्रमांत लोक सहभागी होतात. अशा वेळी प्राण्यांच्या जीवनावर आधारलेला आहार टाळण्याची भावना सहअस्तित्व आणि दया या तत्त्वांना समर्थन देते.

5. श्रावण महिना म्हणजे एक सामाजिक उत्सवाचा काळ असतो. अनेक घरांमध्ये एकत्र जेवण, व्रत-उपवास आणि पूजा केली जाते. सात्विक आणि हलकं अन्न हे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना अनुकूल असतं – विशेषतः वृद्ध, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींसाठी.

Leave a Comment