What is Reason of Yavat Rada : व्हॉट्सअपवरील एक आक्षेपार्ह पोस्ट. त्यामुळे दौंडच्या यवतमध्ये दोन गट आपापसांत भिडले आणि मोठा राडा झाल्याचं वृत्त समोर आल. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला, अशी माहिती मिळत आहे.
नक्की काय घडलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमधील हिंसाचारावर बोलताना म्हटले की, मी या घटनेसंदर्भात माहिती घेतली आहे. यवतमध्ये ठिकाणी एका बाहेरील व्यक्तीने कोणत्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला, असं स्टेटस ठेवलं होतं. त्यामुळे हा सगळा तणाव निर्माण झाला आहे. लोकं संतापली अन् थेट रस्त्यावर आली, जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज देखील करावा लागला. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही समाजाची लोकं एकत्र बसलेली असून तणाव कमी करण्याचे काम सुरु आहे. जाणीवपूर्वक असा तणाव निर्माण करण्याचे काम केलं जात असल्याचा आरोप देखील यावेळी मुख्यमंत्री यांनी केलाय. त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.
घटनेचे व्हिडिओ व्हायरल
यवतमधील या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले होते, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, यवतमध्ये आता सध्या शांतता आहे. समोर आलेले व्हिडिओ यवतमधील आहे, की बाहेरील… हे बघावं लागेल. अशा प्रकरणांत अनेकदा बाहेरचे व्हिडिओ देखील दाखवले जातात. या व्हिडिओची चौकशी केली जाईल. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे अन् कायदा हातात न घेण्याचे आवाहन केलं आहे.
दौंडचे आमदार राहुल कूल यांनी याप्रकरणी बोलताना सांगितले की, गेले दोन ते तीन दिवस यवतमध्ये तणावपूर्ण वातावरण होतं. सगळ्यांशी संपर्क करुन तणाव निवळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत होते. आता सध्या तिथे जमाव जमला असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैणात करण्यात आलाय. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील आमदार राहुल कूल यांनी स्पष्ट केलं आहे.
विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
या घटनेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाष्य केलं आहे. ज्या भागांमध्ये कधी तणाव निर्माण झाला नाही, तिथे अशा हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. राजकीय हितासाठी महाराष्ट्राच स्वास्थ खराब करण्याचं काम सुरु असल्याच देखील त्यांनी यावेळी म्हटलं. हे निंदणीय असून तणाव शांत करण्याचे काम पुढाऱ्यांचे आहे. मात्र सध्याचे पुढारी जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा देखील आरोप यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला.
अचानक दगडफेक अन् जाळपोळ
शुक्रवारी दुपारी दौंड तालुक्यातील यवतमध्ये अचानक एक जमाव आक्रमक झाला. घरांवर आणि दुकानांवर तुफान दगडफेक केली. काही ठिकाणी जाळपोळ सुद्धा झाली. त्यानंतर पोलिसांनी सक्रिय होत तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी यवतमध्ये धाव घेतली. तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.मध्य प्रदेशमध्ये एक घटना घडलेली होती. ती घटना घडल्यानंतर संबंधित व्यक्तीने मोबाईलमध्ये एक पोस्ट केली होती. त्यानंतर ही सगळी गडबड सुरू झाली. यवतमध्ये सगळी परिस्थिती नियंत्रणात असून सगळे वरिष्ठ पोलिस अधिकारी तिथे आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नये, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.
ज्या व्यक्तीने पोस्ट केली, त्याचा स्थानिक लोकांशी कोणताही संबंध नाही. तो बिगारी गवंडीचं काम करतो. नांदेडावरून यवतमध्ये आलेला आहे. सोशल मीडियावर देखील या घटनेचे व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत. तिथे पोलिसांनी कलम 144 लावले आहे. यवतमध्ये गेले दोन ते तीन दिवस हे तणावपूर्ण वातावरण होतं. सर्वांशी संपर्क केला जात आहे. सध्या यवतमध्ये मोठा फौजफाटा देखील तैणात करण्यात आला आहे. सरकार या प्रकरणात अतिशय गंभीर आहे. सोशल मीडियावर अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
Disclaimer : दौंड तालुक्यातील यवतमध्ये मोठा राडा झाला. तिथे नेमकं काय आणि कशामुळे घडलं? हे आपण सविस्तर जाणून घेऊ या.